केज :- न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेला दावा काढून का घेत नाहीस? असे म्हणत एका दिव्यांग व्यक्तीस दोन महिलांसह चौघांनी शिवीगाळ करीत लोखंडी खीळ व दगडाने मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना केज तालुक्यातील गदळेवाडी (शिरूरघाट) येथे घडली. जखमींवर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून चौघां विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील शिरूरघाट येथील गदळेवाडी बाळकृष्ण बाबासाहेब जोगदंड (वय ५०) हे आठ ते दहा वर्षाचे असताना त्यांना पोलिओ होऊन ते ४५ टक्के दिव्यांग झालेले आहेत. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गावातील नृसिंह मंदीराच्या समोरील सिमेंटच्या बाकड्यावर बसले होते. त्याठिकाणी गावातील माधव बाबासाहेब नायकोडे, बाबासाहेब गणपती नायकोडे, गंगुबाई बाबासाहेब नायकोडे, प्रियंका माधव नायकोडे हे चौघे आले. त्यांनी त्यांच्या अपंगत्वावर बोलून "तु आमच्या विरुध्द शेतीचा केज कोर्टात दाखल केलेला दिवाणी दावा काढून का घेत नाहीस, त्याच्या आम्हाला सारख्या कोर्टच्या तारखा येत आहेत. आम्ही कधीपर्यंत कोर्टात चकरा मारायच्या." असे म्हणत शिवीगाळ केली. त्यांना ते अपंगत्वाचा फायदा घेऊ नका, शिवीगाळ करू नका असे म्हणताच माधव नायकोडे याने बैलगाडीची लोखंडी खिळ त्यांच्या डोक्यात मारीत असताना हाताने आडविल्याने हाताच्या व कोपरा जवळ मार लागून जखम झाली. त्या नंतर माधव याने त्याची पत्नी प्रियंका हिस हात धरायला सांगितल्याने प्रियंका हिने दोन्ही हात धरले. माधव याने लोखंडी खिळ त्यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. ते खाली वाकले असता पाठी मागून बाबासाहेब नायकोडे व त्याची पत्नी गंगूबाई नायकोडे या दोघांनी दगडाने डोक्यात मारून डोके फोडले. त्यांच्या नाका-तोंडातून रक्त निघत होते. डोक्यात गंभीर मार लागल्यामुळे ते चक्कर येऊन खाली पडले. तरी या चौघांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली. गावातील लोकांनी सोडवासोडव करून त्यांना उपचारासाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. त्यांना प्रथमोपचार करून अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या डोक्याच्या समोरील हाड फॅक्चर झाले असून गंभीर दुखापत झाली आहे. उपचार सुरू असताना त्यांनी दिलेल्या जबाबा वरून माधव नायकोडे, बाबासाहेब नायकोडे, गंगुबाई नायकोडे, प्रियंका नायकोडे या चौघां विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु र नं ७१९/२०२६ भा न्या सं ११५(२), ११८(१), ११८(२), ३५२, ३(५) आणि अपंग व्यक्तीचे अधिकार काम ९२(इ) गुन्हा दाखल झाला आहे.
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर हे तपास करीत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!