केज तालुक्यातील चिंचोली (माळी) गावचे सुपुत्र आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 'कोब्रा' विशेष दलात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले मेघराज तुळशीराम राऊत यांना 'केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक' (विशेष अभियान) जाहीर झाले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पदकाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

मेघराज राऊत यांनी कोब्रा दलात कार्यरत असताना अनेक आव्हानात्मक विशेष अभियानांमध्ये अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या अतुलनीय देशसेवेची दखल घेत, केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पदकासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. यापूर्वीही त्यांच्या धडाकेबाज कामगिरीसाठी त्यांना दलाच्या महासंचालकांकडून 'डीजी डिस्क' या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

एका छोट्याशा ग्रामीण भागातून पुढे येत थेट राष्ट्रीय स्तरावर देशाची सेवा करणाऱ्या राऊत यांच्या या यशामुळे संपूर्ण केज तालुक्यासह बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या राष्ट्रीय गौरवाबद्दल ग्रामस्थांसह सर्व स्तरांतून त्यांचे भरभरून कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.