बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे मशिदीमधील खोली खाली करण्याच्या कारणावरून नमाज पठण करून बाहेर आलेल्या एका तरुणावर तिघांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने भ्याड हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या बेदम मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून, नेकनूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सय्यद अरेफ सलीम (वय ३६, रा. लिंबागणेश) असे जखमी फिर्यादीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सय्यद हे नमाज अदा करून मशिदीबाहेर आले होते. यावेळी शेख खाजा शेख लाल, नबीन मुजीब शेख आणि अर्शद खाजा शेख यांनी त्यांना 'मशिदीमधील खोली खाली का करत नाही' असा जाब विचारत वाद घातला. या वादातून शेख खाजा याने आपल्या हातातील लोखंडी रॉडने सय्यद यांच्या डाव्या हातावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर नबीन शेख याने लाकडी दांडक्याने त्यांच्या पाठीवर व दोन्ही पायांवर वार केले, तर अर्शद याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या तिघांनी सय्यद यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी सय्यद यांच्या तक्रारीवरून २ नोव्हेंबर रोजी नेकनूर पोलिसांत भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मुंडे करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!