केज: केज-अंबाजोगाई महामार्गावरील कुंबेफळ शिवारात बुधवारी रात्री भरधाव वेगात असलेल्या एका होंडा कारने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील दोघे जण जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. २८ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

धडक इतकी भीषण की ट्रॉली उलटली, कारचा चक्काचूर

मिळालेल्या माहितीनुसार, उसाने भरलेला ट्रॅक्टर रस्त्याने जात असताना पाठीमागून आलेल्या होंडा कारने (क्रमांक: एमएच-४४/जी-३०६०) ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा पुढील भाग आणि डाव्या बाजूचा दरवाजा पूर्णपणे चक्काचूर झाला. तर धडकेच्या तीव्रतेमुळे उसाने भरलेली ट्रॉली रस्त्यावरच पलटी झाली आणि सर्व ऊस रस्त्यावर विखुरल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

जखमींवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू

अपघातात जखमी झालेले दोघे जण हे अंबाजोगाई येथील तापडिया कुटुंबातील असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर जखमींना तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या अपघातात ट्रॅक्टरचेही मोठे आर्थिक नुकसान झाले असून, बेदरकारपणे आणि भरधाव वेगात वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाच्या तक्रारीवरून संबंधित कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.