बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बोरी पिंपळगाव येथे घरातून तब्बल ८० हजार रुपये किमतीच्या चार शेळ्या आणि एक बोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेतकरी भाऊसाहेब गणपत गायकवाड (वय ५५) यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबरच्या रात्री गायकवाड कुटुंबीय घरात झोपले असताना रात्री १० ते पहाटे २ च्या दरम्यान ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत या शेळ्या पळवून नेल्या. चोरीला गेलेल्या जनावरांचा शोध घेऊनही ती न सापडल्याने अखेर २ नोव्हेंबर रोजी गायकवाड यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी गेवराई पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पोलीस शिपाई काकडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. वाढत्या चोऱ्यांमुळे परिसरातील पशुपालक शेतकरी चिंतेत आहेत.