अंबाजोगाई: दिवाळीच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या नागरिकांनो, जरा लक्ष द्या! सणाच्या सुट्ट्यांमध्ये अनेक लोक सहकुटुंब बाहेरगावी जातात, याचाच गैरफायदा घेत चोरटे बंद घरे फोडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे घर सोडून जाताना आपल्या घराच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी, असे अत्यंत महत्त्वाचे आवाहन अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक शरद जोगदंड यांनी केले आहे.

बाहेरगावी जाताना घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यांना भक्कम कुलूप लावावे. घरात सोने, चांदी किंवा मोठी रोख रक्कम ठेवण्याऐवजी सुरक्षिततेसाठी बँकेच्या लॉकरचा वापर करावा. आपण गावी जात असल्याची माहिती सोशल मीडियावर लगेच टाकू नये, तसेच रोज येणारे दूध आणि पेपर दारात साचून राहणार नाही याची विशेष व्यवस्था करावी, जेणेकरून घर रिकामे असल्याचे चोरांच्या लक्षात येणार नाही.

घराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि अलार्मचा वीजपुरवठा सुरू ठेवावा. घराची चावी चपलांच्या स्टँडमध्ये किंवा कुंडीखाली उघड्यावर लपवून ठेवण्याची चूक करू नये. प्रवासाला जाण्यापूर्वी विश्वासातील शेजाऱ्यांना आणि शक्य असल्यास अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, ज्यामुळे पोलिसांना गस्त घालताना लक्ष ठेवता येईल. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती दिसल्यास तात्काळ ११२ या पोलीस हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे पोलीस निरिक्षक शरद जोगदंड यांनी स्पष्ट केले आहे.