केज: तालुक्यातील लव्हुरी येथील श्री बडेबाबा विद्यामंदिरात शिक्षक भरती आणि संच मान्यतेमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी गावचे सरपंच पंडित ऊर्फ मुन्ना वसंतराव चाळक हे २७ ऑक्टोबरपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस असून शाळेत संच मान्यता मिळवण्यासाठी बाहेरील विद्यार्थी आणून शिक्षण विभाग आणि शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने अखेर सरपंचांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला.
न्यायालयाच्या आदेशानंतरही शिक्षण विभागाची टाळाटाळ
उपोषणकर्ते चाळक यांनी दिलेल्या निवेदनानुसार, या कथित गैरव्यवहाराच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ९ जुलै २०२६ रोजी आठ आठवड्यांच्या आत चौकशी पूर्ण करून कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. याशिवाय माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी १४ नोव्हेंबर २०२५ आणि २१ जानेवारी २०२६ रोजी लेखी आश्वासनही दिले होते. मात्र, न्यायालयीन निर्देश आणि स्वतः दिलेल्या आश्वासनांना बाजूला ठेवून माध्यमिक शिक्षणाधिकारी जाणीवपूर्वक या प्रकरणाची चौकशी टाळत असल्याचा थेट आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
ग्रामस्थांचा प्रशासनावर संताप
या संदर्भात लव्हुरी येथील ग्रामस्थांनी २१ जानेवारी, ११ ऑक्टोबर आणि १९ ऑक्टोबर २०२६ रोजी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने दिली होती. वारंवार मागणी करूनही शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई केली जात नाही, तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम पवित्रा सरपंच मुन्ना चाळक यांनी घेतला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!