परळी: तालुक्यातील दैठणाघाट शिवारात शेतात सोयाबीन काढत असलेल्या महिलेवर आणि तिच्या मुलावर स्वतःच्या दिराने कत्ती व दगडाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतात काम करत असताना अचानक हल्ला

दैठणाघाट येथील रहिवासी रक्मीन गंगाधर गुट्टे (वय ४५) आणि त्यांचा मुलगा गोविंद हे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास डोंगरवस्ती शिवारातील स्वतःच्या शेतात सोयाबीन काढत होते. त्यावेळी त्यांचा दीर राम श्रीहरी गुट्टे हातात कत्ती घेऊन अचानक तिथे आला आणि त्याने रक्मीन यांच्या डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. आईवर होणारा प्राणघातक हल्ला रोखण्यासाठी मुलगा गोविंद धावून आला असता, कत्ती लागल्याने त्याच्या डाव्या हाताचा दंड आणि बोटे गंभीर जखमी झाली. त्यानंतर हल्लेखोराने रक्मीन यांच्या डोक्यात वार केला.

महिलांची चिथावणी आणि दगडफेक

या हल्ल्यादरम्यान विजयमाला राम गुट्टे, गीता राम गुट्टे आणि सुदामती श्रीहरी गुट्टे या तिघींनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला चिथावणी दिली. त्यानंतर राम गुट्टे याने जमिनीवरील मोठा दगड उचलून रक्मीन यांच्या पायावर मारल्याने त्यांच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले. तसेच इतर आरोपी महिलांनीही दगडाने बेदम मारहाण केल्याने त्यांचे दात पडले. आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी माय-लेकाला उपचारासाठी अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

रक्मीन गुट्टे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलिसांनी राम गुट्टे, विजयमाला गुट्टे, गीता गुट्टे आणि सुदामती गुट्टे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सदानंद मेढके करत आहेत.