परळी शहरात दिवसाढवळ्या चोरीच्या घटना वाढू लागल्या असून, एका ६८ वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्याला तीन अज्ञात भामट्यांनी फसवून त्यांच्याकडील तब्बल एक लाख सात हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी हातोहात लांबवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवार, २८ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास डॉ. सुदाम मुंडे यांच्या जुन्या दवाखान्याच्या इमारतीजवळ घडली.
हलय (ता. परळी) येथील रहिवासी असलेले शेतकरी गणपत लक्ष्मण आंधळे हे दुपारी परळी शहरात आले होते. रस्त्यावरून जात असताना तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना गाठले. या भामट्यांनी वयोवृद्ध आजोबांची दिशाभूल करत त्यांच्या जवळील १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी हातचालाखीने काढून घेतली आणि तिथून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गणपत आंधळे यांना मोठा धक्का बसला.
या घटनेनंतर आंधळे यांनी रात्री परळी शहर पोलीस ठाणे गाठून आपली आपबिती सांगितली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार दराडे हे करत आहेत. शहरात भरदिवसा वयोवृद्धांना टार्गेट करणाऱ्या या भामट्यांमुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!