परळी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक एक रिकामा असतानाही पंढरपूर-अकोला रेल्वेगाडी अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर आणल्याने प्रवाशांची प्रचंड धावपळ उडाली. ऐनवेळी दादरा चढून जावे लागल्याने अनेक प्रवाशांना गाडी पकडता आली नाही आणि त्यांच्या डोळ्यादेखत गाडी निघून गेली. हा प्रकार परळी स्थानकावर घडला असून रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
फलाटावरील साहित्यामुळे अपघाताचा धोका
परळी रेल्वे स्थानकाच्या तिसऱ्या फलाटावर सध्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र बांधकामाचे साहित्य विखुरलेले आहे. अशातच ऐनवेळी गाडी या फलाटावर आल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून धावपळ करावी लागली. अस्ताव्यस्त पडलेल्या साहित्यामुळे प्रवाशांना दुखापत होण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता.
प्रवाशांच्या संतापात भर
फलाट बदलल्यामुळे गाडी हुकलेले प्रवासी शेख निजाम यांनी आपली व्यथा मांडली. दादरा चढून तिसऱ्या फलाटावर पोहोचेपर्यंत गाडी निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर सुमारे दीड वाजता प्लॅटफॉर्म एकवर आलेली पंढरपूर-निजामाबाद गाडी अकोल्यापर्यंत जात नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. या भोंगळ कारभाराबद्दल रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते ॲड. मनोज आप्पा संकाये यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अकोला गाडी नेहमी एक नंबर फलाटावरूनच सोडावी, तसेच तिसऱ्या फलाटावरील बांधकाम साहित्य हटवून पिण्याचे पाणी व अन्य सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!