मुंबई :- राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ठाम ग्वाही मंत्री दत्ता भरणे यांनी दिली आहे. दीपावलीपूर्वी जाहीर केलेल्या ५००० रुपये अग्रीम मदतीपैकी सुमारे ९३ ते ९५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. उर्वरित १० लाख शेतकऱ्यांची मदत ई-केवायसी आणि कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी प्रलंबित असून, पुढील ८ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या खात्यातही रक्कम जमा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सुधारित दुष्काळ प्रस्ताव आणि पाणीटंचाईवर उपाययोजना केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीचे (एनडीआरएफ) प्रतिहेक्टरी नुकसान भरपाईचे दर वाढवले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला मान्यता दिली आहे. या वाढीव दरानुसार राज्याचा दुष्काळ मदत प्रस्ताव सुधारित करून केंद्राकडे पाठवला जात आहे. राज्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन जास्तीत जास्त निधीची मागणी केली आहे. पुढील ६ ते ७ महिने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कृषी, जलसंधारण आणि ग्रामविकास विभागामार्फत 'पाणी आडवा, पाणी जिरवा' मोहिमेंतर्गत शेततळी व पाझर तलावांतील गाळ काढण्याची कामे वेगाने हाती घेतली जात आहेत.
साखर कारखानदार आणि फायनान्स कंपन्यांना इशारा पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ३५०० रुपये प्रतिटन दर जाहीर केला असला तरी कोल्हापूर व सोलापूर भागात दरावरून काही कारखाने बंद आहेत. दुष्काळाचे संकट पाहता कारखानदारांनी सामंजस्याची भूमिका घेऊन लवकरात लवकर तोडगा काढावा, असे आवाहन भरणे यांनी केले. तसेच, राज्य सरकारच्या आदेशानुसार राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी कर्जवसुली थांबवली आहे; मात्र खाजगी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून अद्यापही तगादा लावला जात असल्याच्या तक्रारी आहेत. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर राज्य सरकार कठोर कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
'चैत्यभूमी' नामांतरण आणि बारामतीतील 'एकनाथ भवन'वर भाष्य दादर रेल्वे स्थानकाला 'चैत्यभूमी' नाव देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, बारामतीमध्ये शिंदे सेनेकडून उभारल्या जाणाऱ्या 'एकनाथ भवन'बाबत विचारले असता, महायुतीतील प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. "एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आमचे नेते आहेत. शिंदे सेनेचे कार्यालय इंदापूरला झाले काय किंवा बारामतीला, आम्हाला आनंदच आहे; उलट तिथे आम्हीही जाऊन चहा पिऊ आणि बैठका घेऊ," अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!