आष्टी: आष्टी तालुक्यातील पिंप्री घाटात एका २३ वर्षीय तरुणाचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अभिषेक नामदेव बरकंबे असे या मृत तरुणाचे नाव असून, पैशांच्या वादातून त्याच्याच दोन मित्रांनी त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यरात्री घरातून बोलावून नेले
फिर्यादी नामदेव विठ्ठल बरकंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा अभिषेक हा पुण्याच्या शिक्रापूर येथे कुटुंबासोबत राहत होता. २४ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अभिषेकचा मित्र संदीप सोनकर त्यांच्या घरी आला. संदीपने अभिषेकला राम नावाच्या मित्राने बोलावल्याचे सांगून घराबाहेर नेले. यावेळी पैशांच्या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची सुरू असल्याचे फिर्यादीने पाहिले होते, त्यानंतर अभिषेक बेपत्ता झाला.
सोशल मीडियावरील बातमीने उलगडले गूढ
अभिषेक घरी न परतल्याने कुटुंबीयांनी संदीप आणि राम यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अभिषेकच्या एका मित्राने मोबाईलवर पाठवलेल्या एका अनोळखी मृतदेहाच्या बातमीवरून कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी बीडच्या सरकारी रुग्णालयात जाऊन खात्री केली असता, तो मृतदेह अभिषेकचाच असल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकीय अहवालात अभिषेकचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी संदीप लल्लू सोनकर आणि राम उर्फ भागवत जालिंदर आरे (दोघे रा. शिक्रापूर, पुणे) यांच्याविरुद्ध खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विक्रांत हिंगे अधिक तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!