आष्टी तालुक्यातील पिंपळा शिवारात कौटुंबिक वादातून स्वतःच्या नातेवाईकांनीच एका शेतकऱ्यावर आणि त्याच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी शेत सर्वे नंबर २८५ मध्ये झालेल्या या हाणामारीत आरोपींनी शेतकऱ्याच्या डोक्यात लोखंडी गज घालून त्यांना गंभीर जखमी केले आहे. दादासाहेब देविदास भवर (वय ३४, रा. पिंपळा) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून याप्रकरणी चार जणांविरुद्ध अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दादासाहेब भवर आणि आरोपी हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी दादासाहेब हे आपल्या पत्नीसह शेतात असताना धनराज देविदास भवर, आतिष देविदास भवर, योगिता धनराज भवर (सर्व रा. पिंपळा) आणि महादेव भागचंद शेळके (रा. मुंबेवाडी) यांनी संगनमत करून तिथे धाव घेतली. आरोपींनी भवर दाम्पत्याला अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली. याच झटापटीत आरोपी धनराज भवर याने हातातील लोखंडी गजाने दादासाहेब यांच्या डोक्यात जोरदार प्रहार करून त्यांना रक्तबंबाळ केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलीस अंमलदार खांडेकर पुढील तपास करत आहेत.