आष्टी: आष्टी-जामखेड महामार्गावर उभ्या वाहनांमधून डिझेल चोरी करणाऱ्या एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा आष्टी पोलिसांनी थरारक पाठलाग करून पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे चिंचपूर परिसरात सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली असून, चोरीसाठी वापरण्यात येणारी आलिशान बीएमडब्ल्यू (BMW) आणि विनानंबरची स्विफ्ट कार यांसह एकूण चार चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ४५० लिटर चोरीचे डिझेल, डिझेल काढण्याची मोटार आणि पाईप जप्त करत मुख्य आरोपी गोविंद पोपट शिरसाट (रा. मातकुळी) याच्यासह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांचा सिनेमॅटिक पाठलाग आणि कारवाई

शनिवारी सकाळी आष्टी-जामखेड रस्त्यावर डिझेल चोरणारी टोळी सक्रिय असल्याची पक्की माहिती पोलीस अंमलदार नागेश लोमटे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी भारत पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी यांच्या पथकाने तातडीने महामार्गावर नाकाबंदी करून संशयित वाहनांचा शोध सुरू केला. संशयास्पद वाटणाऱ्या काळ्या काचांच्या स्विफ्ट कारला पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला असता आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी अत्यंत शिताफीने पाठलाग करून मुख्य संशयित गोविंद शिरसाट याला ताब्यात घेतले. वाहनाची झडती घेतली असता आतमध्ये डिझेलने भरलेले तब्बल ११ ड्रम आढळून आले.

अनेक जिल्ह्यांत गुन्ह्यांची नोंद

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या टोळीमध्ये मातकुळी परिसरातील २० ते ३० वयोगटातील तरुणांचा मोठा सहभाग असल्याचे समोर आले आहे. या टोळीवर बीडसह अहमदनगर आणि लगतच्या जिल्ह्यांमध्येही वाहनचोरी व डिझेल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. रात्रीच्या वेळी महामार्गावर उभ्या असलेल्या मालवाहू ट्रक चालकांना लक्ष्य करून ही टोळी डिझेल पळवत होती. या कारवाईमुळे महामार्गावरील मालवाहतूकदारांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून फरार साथीदारांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.