आष्टी तालुक्यातील कोहिणी शिवारात शेतकऱ्याच्या विहिरीवरील सोलर पंप, केबल वायर आणि सौर प्लेट्स अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. १९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडलेल्या या चोरीमुळे शेतकऱ्याचे तब्बल ४४ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे.

कोहिणी येथील शेतकरी जालिंदर भागवत भवर (वय ३७) यांच्या शेत गट क्रमांक ५५ मधील विहिरीवर बसवलेला कॅप्टन कंपनीचा २५ हजार रुपयांचा सोलर पंप व मोटर, १५ हजारांची १०० फूट केबल आणि अविष्कार काकडे यांच्या शेतातील ४ हजार ८०० रुपयांच्या शक्ती कंपनीच्या सौर प्लेट्स असा एकूण ४४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. सकाळी शेतात गेल्यानंतर ही चोरी उघडकीस आली. जालिंदर भवर यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिसांनी दोन संशयित आरोपी, अनिकेत विकास गाडे (रा. पिंपरी चिंचवड, पुणे) आणि कृष्णा साठे (रा. आष्टी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार सानप तपास करत आहेत.