परळी वैजनाथ: वाढते तापमान आणि पावसाच्या अनपेक्षित लहरीपणामुळे मराठवाड्यातील शेती क्षेत्र सध्या अभूतपूर्व संकटात सापडले आहे. हवामान बदलाच्या या गंभीर संकटाचा शास्त्रीय व सखोल वेध घेण्यासाठी मराठवाड्यातच एक अद्ययावत ‘हवामान अभ्यास व संशोधन केंद्र’ उभारणे ही काळाची गरज बनली आहे, असे रोखठोक प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी केले.
गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती व्याख्यानमाला
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार तथा महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या १८ व्या स्मृती दिनानिमित्त मोहा (ता. परळी) येथे गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी आयोजित स्मृती व्याख्यानमालेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. पी. एस. घाडगे होते. यावेळी वाढते औद्योगिकीकरण, अनिर्बंध नागरीकरण आणि होणाऱ्या वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालल्याकडे देऊळगावकर यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
विचारांचा वारसा पुढे नेणार: ॲड. अजय बुरांडे
प्रास्ताविक करताना संस्थेचे सचिव ॲड. अजय बुरांडे यांनी गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या सामाजिक, मानवतावादी आणि संघर्षशील विचारांचा वारसा संस्था सातत्याने जपत असल्याचे स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीमध्येही स्मृती प्रतिष्ठान व शिक्षण संस्था जनतेला भावनिक आधार, दर्जेदार शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या मंचावर समाज प्रबोधन अकॅडमीचे सुधाकर शिंदे, संजय मोरे, ज्येष्ठ संचालक प्रा. धुळे, मुरलीधर नागरगोजे, सुदाम शिंदे, संदीपान तेलगड, सखाराम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन ब्रह्मानंद देशमुख व अंगद पेद्देवाड यांनी केले, गणेश कुरे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला, तर प्राचार्य मुरलीधर बोराडे यांनी आभार मानले.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!