छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने आज देमनी शिवारातील शेतांना भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान पथकातील अधिकाऱ्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून नुकसानीची सविस्तर माहिती जाणून घेतली.

सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान

देमनी येथील शेतकरी विलास देविदास शिंदे यांच्या गट क्रमांक ८४ मधील १ हेक्टर २० आर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाची पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाअभावी हे संपूर्ण पीक करपून गेल्याचे विदारक चित्र यावेळी समोर आले. पाण्याअभावी हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून, पीडित शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आणि वास्तव परिस्थिती केंद्रीय अधिकाऱ्यांसमोर मांडली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली हे पथक दाखल झाले आहे. या पथकात महालनोबिस राष्ट्रीय पीक पूर्वानुमान केंद्राचे उपसंचालक सुनील कुमार दुबे, नीती आयोगाचे सल्लागार डॉ. जसपाल सिंग तसेच पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन अधिकारी डॉ. साक्षी भदौरिया यांचा समावेश आहे. या पाहणी दौऱ्यावेळी राज्याच्या कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्यासह स्थानिक प्रशासनातील वरिष्ठ महसूल व कृषी अधिकारी उपस्थित होते.