अंबाजोगाई: तालुक्यातील गिरवली शिवारात विकत घेतलेल्या शेतात गेल्याच्या कारणावरून एका ३६ वर्षीय तरुणाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आठ जणांवर ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अतुल काशिनाथ जोगदंड (वय ३६, रा. गिरवली बावणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी गिरवली शिवारातील गट क्रमांक २ मधील जमीन खरेदी केली होती. मात्र, शेजारील शेती असलेले आरोपी गंगाधर रामभाऊ आपेट, अशोक रामभाऊ आपेट, महादेव विठ्ठल आपेट, उत्तरेश्वर अशोक आपेट, परमेश्वर अशोक आपेट, अक्षय गंगाधर आपेट, अर्चना गंगाधर आपेट आणि वैजंता मुरलीधर जगदाळे (सर्व रा. गिरवली आपेट) हे त्यांना या जागेचा ताबा घेऊ देत नव्हते आणि शेतात जाण्यास विरोध करत होते.

दोन नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता फिर्यादी आपल्या शेतात कामासाठी गेले असता, सर्व आरोपींनी त्यांना अडवून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत महादेव आपेट याने काचेची बाटली डोक्यात मारून फिर्यादीला जखमी केले.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात सर्व आठ आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (ॲट्रॉसिटी) आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश हनुमंत शिंदे हे करत आहेत.