गेवराई: सामाईक शेतातील ऊस न विचारता तोडून नेल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर कुऱ्हाड आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. डोईफोडेवाडी शिवारात ही भयंकर घटना घडली असून याप्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर नामदेव कोरडकर (वय ३२, रा. गोविंदवाडी, ता. गेवराई) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्वर आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये जमिनीचा वाद सुरू असून सामाईक क्षेत्राची नोंद ७/१२ उताऱ्यावर आहे. मंगळवारी सकाळी ज्ञानेश्वर आणि त्यांचे वडील सामाईक शेतातील ऊस हार्वेस्टरद्वारे तोडून नेल्याचा जाब विचारण्यासाठी डोईफोडेवाडी येथे गेले होते. तिथे त्यांनी ऊस न विचारता का नेला, असे विचारताच तुळशीराम रामभाऊ वाघमोडे (रा. गोविंदवाडी) याने घरातून कुऱ्हाड आणून ज्ञानेश्वर यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घातला.
यानंतर अनिकेत तुळशीराम वाघमोडे आणि संकेत तुळशीराम वाघमोडे (दोघे रा. गोविंदवाडी) यांनी काठ्यांनी ज्ञानेश्वरला मारहाण केली. तसेच गणेश कुंडलिक वाघमोडे, बाबासाहेब महादेव रुपनर आणि वैजीनाथ एकनाथ वाघमोडे (सर्व रा. डोईफोडेवाडी) यांनीही काठीने मारहाण करून ज्ञानेश्वर आणि त्यांच्या वडिलांना जखमी केले. जखमी ज्ञानेश्वर यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड हे पुढील तपास करत आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!