केज : गर्दीच्या ठिकाणांवरून, जत्रा आणि आठवडी बाजारातून चोरीला गेलेले तसेच गहाळ झालेले तब्बल १४ मोबाईल शोधून काढण्यात केज पोलिसांना यश आले आहे. केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या पथकाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे सर्व मोबाईल हस्तगत केले असून, ते मूळ मालकांना सुपूर्द करत त्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलवले आहे.
तांत्रिक तपासातून लागला छडा
चोरीला गेलेला मोबाईल पुन्हा मिळेल की नाही, या साशंकतेमुळे अनेक नागरिक पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे टाळतात. मात्र, केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध घटनांमध्ये मोबाईल हरवल्याच्या व चोरीला गेल्याच्या १४ तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तपास चक्र गतीमान केली. तपास पथकाने 'सीईआयआर' (CEIR) प्रणालीच्या माध्यमातून तांत्रिक विश्लेषण व ट्रेसिंग करून गहाळ झालेल्या सर्व १४ मोबाईलचा शोध लावला आणि ते जप्त केले. त्यानंतर संबंधित मूळ मालकांशी संपर्क साधून खात्री पटल्यानंतर हे मोबाईल अधिकृतपणे त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. हरवलेला मौल्यवान ऐवज परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलीस उपनिरीक्षक राजू वाघमारे, पोलीस अंमलदार शिवाजी कागदे, नितीन वारे, संतोष गिते आणि नितीन जाधव यांच्या पथकाने केली.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!