बीड: बीड शहरात रस्त्यावर हॉर्न वाजवल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका पोलीस कर्मचाऱ्यावर आणि त्यांच्या मित्रावर अज्ञातांनी लोखंडी रॉड आणि दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २१ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री नगर रोडवर घडली.

या प्रकरणी फिर्यादी धिरज कल्याण खांडेकर (वय ३३, रा. बापुजीनगर पालवण चौक, बीड) यांनी तक्रार दिली आहे. धिरज हे गेवराई पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. रात्री जेवण करून ते मित्र संतोष शिंदे यांच्यासोबत दुचाकीवरून घरी परतत असताना बालेपीर पुलावर दोन दुचाकींवरील चार अज्ञात इसमांनी त्यांचा रस्ता अडवला. पुढे जाण्यासाठी रस्ता मिळावा म्हणून धिरज यांनी हॉर्न वाजवला आणि गाडी पुढे काढली.

याचा राग आल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्या बंगल्यापुढे आरोपींनी पुन्हा त्यांना अडवले आणि शिवीगाळ केली. आपण पोलीस असल्याचे सांगितल्यावर आरोपी अधिकच चिडले आणि त्यांनी धिरज यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्या पायावर मोठा दगड फेकून मारला. यावेळी मित्र संतोष यालाही दगडाने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण केल्यानंतर आरोपींनी आपल्या आणखी साथीदारांना बोलावून घेतले व नंतर ते पसार झाले.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे हे करीत आहेत. पोलिसांचे विशेष पथक फरार आरोपींचा शोध घेत आहे.