बीड जिल्ह्यातील वडवणी येथील साठे चौकात बसमध्ये चढत असताना एका साठ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील ४४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोठरबन (ता. वडवणी) येथील रहिवासी असलेल्या सुभाबाई पांडुरंग मुंडे (वय ६०) या त्यांच्या मुलीसोबत बीड येथील सरकारी दवाखान्यात जाण्यासाठी निघाल्या होत्या. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्या वडवणीतील साठे चौकातून बसमध्ये चढत होत्या. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील अडीच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी असा एकूण ४४ हजार रुपयांचा ऐवज हातोहात लांबवला.
या घटनेनंतर सुभाबाई यांनी ४ नोव्हेंबर रोजी वडवणी पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर फिर्याद दिली. उशिरा दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार उबाळे हे करत आहेत. गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला जाण्याच्या घटना वाढत असल्याने ग्रामीण भागातील महिला प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!