केज: केज शहरापासून अवघ्या १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या तांदळे वस्तीवर नोव्हेंबर महिन्यातच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिक आणि जनावरांचे पाण्यावाचून मोठे हाल होत आहेत. तीनही बाजूंनी डोंगराने वेढलेल्या या वस्तीकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने १०० ते १२५ लोकवस्तीच्या या गावाला अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.
आटलेली विहीर आणि जीवघेणा प्रवास
मारे २० ते २५ कुटुंबे राहणाऱ्या या वस्तीतील बहुतांश तरुणवर्ग ऊसतोडणीसाठी बाहेरगावी स्थलांतरित झाला आहे. त्यामुळे वस्तीवर केवळ वृद्ध आणि लहान मुलेच आहेत. गावाच्या आग्नेय दिशेला असलेली एकमेव विहीर नोव्हेंबरमध्येच कोरडी पडली आहे. डोंगर-दऱ्यांतील निसरड्या आणि उताराच्या वाटेवरून डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणणे वृद्धांसाठी जीवघेणे ठरत आहे. पिण्याच्या पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे नागरिकांना आंघोळीचे पाणी पुन्हा धुणी-भांड्यांसाठी वापरावे लागत असून, घरात शौचालये असूनही पाण्याअभावी उघड्यावर जाण्याची वेळ आली आहे.
नऊ हजार रुपये खर्चून विहिरीत सोडले टँकरचे पाणी
वस्तीवरील पाण्याची विदारक स्थिती पाहून ऊसतोडणीसाठी ३०० किलोमीटर दूर गेलेले मारुती तांदळे यांना पत्नीच्या फोननंतर तातडीने गावी परतावे लागले. घरात पिण्यासाठी थेंबभरही पाणी नसल्याने त्यांनी केजमधून सुमारे नऊ ते दहा हजार रुपये खर्चून पाण्याचा टँकर मागवला आणि वस्तीपासून दीड किलोमीटर अंतरावरील डोंगरातील विहिरीत पाणी सोडले, जेणेकरून पुढील १० ते १५ दिवस वस्तीची तहान भागू शकेल.
टँकर आणि साठवणूक टाकीची तातडीची गरज
तारनाळीपर्यंत पक्का रस्ता असला तरी, पुढे तांदळे वस्तीपर्यंत अडीच ते तीन किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे उखडलेला आणि कच्चा आहे. वस्तीवर नळपाणी पुरवठा योजना किंवा पाणी साठवणुकीची कोणतीही सोय नाही. त्यामुळे शासनाने तातडीने येथे पाण्याचा टँकर सुरू करावा आणि पाणी साठवण्यासाठी लोखंडी किंवा प्लास्टिकच्या टाक्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. केवळ महामार्गावरून दुष्काळी दौरे न करता अधिकाऱ्यांनी या दुर्गम वस्तीवर येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!