गेवराई: तालुक्यातील हिरापूर येथील साईप्रसाद गूळ व साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील उसाचा दर जाहीर न करताच गाळप सुरू केल्याने संतप्त झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी थेट कारखान्याच्या गव्हाणीत उतरून गाळप बंद पाडले आहे. वाढता खर्च आणि दुष्काळी परिस्थितीने होरपळत असलेल्या बळीराजाने आपल्या घामाच्या रास्त दामासाठी हा आक्रमक लढा उभारला असून, जोपर्यंत दराची अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत कोयता चालणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या आणि इशारा
यंदाची भीषण दुष्काळी परिस्थिती आणि शेतीमशागतीच्या वाढलेल्या अफाट खर्चामुळे शेतकरी आधीच आर्थिक दुष्टचक्रात अडकला आहे. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना विश्वासात न घेताच कारखान्याने गुऱ्हाळ सुरू केल्याने संतापाचा उद्रेक झाला. आहेर चिंचोली येथील बैठकीतील निर्णयानुसार चालू हंगामात पहिली उचल विना कपात प्रतिटन चार हजार रुपये मिळावी आणि उसाचा अंतिम दर प्रतिटन साडेचार हजार रुपये जाहीर करून त्याची लेखी हमी द्यावी, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासोबतच गतवर्षीच्या हंगामातील प्रतिटन पंच्याहत्तर रुपयांची थकीत रक्कम तत्काळ देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. घामाचा मोबदला मिळाल्याशिवाय हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा सज्जड इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.

तोडणी व वाहतूक रोखण्याचे आवाहन
कारखाना प्रशासनाची मनमानी खपवून न घेण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. जोपर्यंत ऊस दराबाबत ठोस आणि लेखी निर्णय जाहीर केला जात नाही, तोपर्यंत मुकादमांनी आणि ऊस तोडणी मजुरांनी उसाची तोड व वाहतूक करू नये, असे आवाहन शेतकरी प्रतिनिधींनी केले आहे. या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, राजेंद्र आमटे, अजय करांडे, जानकीराम कोरडे, सुदर्शन सुरवसे, गणेश रकटे आणि कैलास मुळे यांच्यासह पंचक्रोशीतील शेकडो ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. कारखान्याने आपला आडमुठेपणा न सोडल्यास आणि तातडीने दराचा निर्णय न घेतल्यास हा असंतोषाचा वणवा अधिक भडकेल, असेच चित्र सध्या हिरापूर परिसरात निर्माण झाले आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!