परळी तालुक्यातील कौठळी येथे गणेश विसर्जनासाठी गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे गावावर आणि परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.

नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना

आदिनाथ भाऊराव जाधव (वय २०, रा. कौठळी) असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. आदिनाथ हा गावातील इतर नागरिकांसमवेत कौठळी येथील नदीपात्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेला होता. विसर्जन करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात ओढला गेला आणि बुडाला. उपस्थितांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या प्रवाहात तो बेपत्ता झाला. शर्थीच्या प्रयत्नांनंतर त्याला पाण्याबाहेर काढण्यात आले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.

परळी ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून आदिनाथचा मृतदेह परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. वैद्यकीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भरल्या संसारातील ऐन पंचविशीतील तरुणाचा अशा अपघाती मृत्यूमुळे कौठळी गावात हळहळ व्यक्त होत आहे.