आष्टी: तालुक्यातील कडा येथे गुरुवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान जुन्या वादाच्या रागातून एका अठरा वर्षीय तरुणावर तीन ते चार जणांनी चाकूने सपासप वार करत जीवघेणा हल्ला केला. या रक्तरंजित घटनेत रेहान अन्वर शेख हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिरवणुकीतून बाजूला नेऊन घातपात
कडा येथील स्थानिक गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक गुरुवारी सायंकाळी उत्साहात ग्रामपंचायत कार्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे राम मंदिराकडे जात होती. रात्री नऊ वाजेच्या सुमारास मिरवणुकीत असलेल्या रेहान शेख याला काही तरुणांनी बोलण्याच्या बहाण्याने बाजूला बोलावले. शहरातील जुन्या बारवाजवळ पोहोचताच हल्लेखोरांनी अचानक आपल्या कमरेला लपवलेले धारदार चाकू काढून रेहानच्या छाती, पोट आणि हातावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या रेहानला पाहून परिसरात एकच धावपळ उडाली, ज्याचा फायदा घेत हल्लेखोर अंधारात पसार झाले.
प्रकृती चिंताजनक, पोलिसांचा तपास सुरू
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रेहानला तात्काळ कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, रक्तस्त्राव जास्त झाल्यामुळे प्रथमोपचारानंतर त्याला तातडीने अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. त्याची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच कडा पोलीस आणि आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पसार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!