बीड : ढाब्यावरील जेवणाच्या उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका २१ वर्षीय तरुणाला कमरेचा बेल्ट, लाकडी दांडका आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बीड तालुक्यातील रामनगर परिसरात घडली आहे. ही घटना २ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास कुमशी रोडवरील मोकळ्या जागेत घडली.

अमोल बबन शिंदे या तरुणाला बळीराम मोहिते, अविनाश ढेरे, योगेश खरसाडे, अजय ढेरे आणि ज्ञानेश्वर मोहिते (सर्व रा. रामनगर) यांनी संगनमत करून मारहाण केली. आरोपींनी अमोलच्या पाठीवर, हाता-पायावर, नाकावर आणि डोळ्यांवर बेल्ट व लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी अमोल शिंदे याच्या फिर्यादीवरून ७ ऑक्टोबर रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सपोनि सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.