आष्टी तालुक्यातील भंडारवाडी ते धामणगाव रस्त्यावरील केंद्रे वस्तीजवळ भरधाव पिकअपच्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात ५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे नऊच्या दरम्यान घडला असून वाहन चालकाविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर भाऊसाहेब केंदारे (वय २५) यांचा चुलत भाऊ किशोर दादासाहेब केंदारे हे धामणगावहून केंद्रे वस्तीकडे येत होते. यावेळी समोरून येणाऱ्या महिंद्रा पिकअपच्या (वाहन क्र. 8-23-8619) चालकाने, नितीन साहेबराव गायकवाड याने त्याचे वाहन अत्यंत निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात चालवत दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात किशोर केंदारे यांना गंभीर दुखापत झाली आहे. सागर केंदारे यांच्या तक्रारीवरून पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार येवले या प्रकरणाचा तपास करत आहेत.