बीड जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने पावसाळ्याच्या अखेरीसच भीषण पाणीटंचाईचे मोठे संकट ओढवले आहे. जिल्ह्यातील ९० गावे आणि १२४ वाड्यांमधील तब्बल २ लाख ९९ हजार नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने या ३ लाख लोकांची तहान भागवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात २०१ टँकर्स सुरू केले असून, सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी ६७ खाजगी विहिरी आणि बोअरवेलचे अधिग्रहण केले आहे.
या जलसंकटाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला असून एकट्या ग्रामीण भागात १६४ खाजगी टँकर्स धावत आहेत. आष्टी आणि गेवराई तालुक्यात परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, सर्वाधिक टँकर्स याच भागात सुरू आहेत. विशेष म्हणजे, संपूर्ण जिल्ह्यात सध्या एकही शासकीय टँकर नसून सर्व २०१ टँकर्स खाजगी कंत्राटदारांमार्फत चालवले जात आहेत. अंबाजोगाईसह पाच तालुक्यांना सध्या तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी आगामी उन्हाळा अत्यंत कठीण जाण्याची चिन्हे आहेत.
या भीषण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नागरिकांना पाण्याचा एक-एक थेंब जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाणीटंचाई निवारणार्थ लागणाऱ्या निधीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे व सर्व विभागांनी समन्वय साधण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!