पुणे: इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट्स (आयएपी) एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६ मध्ये पुण्याच्या संचेती कॉलेज ऑफ फिजिओथेरपीने आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवत तीन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. नवी दिल्ली येथील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित 'वर्ल्ड फिजिओथेरपी एशिया वेस्टर्न पॅसिफिक' परिषदेदरम्यान या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. संस्थेला मिळालेल्या या बहुमानामुळे वैद्यकीय व शैक्षणिक वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तीन महत्त्वपूर्ण श्रेणींमध्ये सन्मान

या सोहळ्यात संचेती कॉलेज ऑफ फिजिओथेरपीला 'सर्वोत्कृष्ट महाविद्यालय' हा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात आला. यासोबतच संस्थेचे प्रमुख रुग्णालय असलेल्या 'संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशन' (एसआयओआर) ला 'टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड सेंटर अवॉर्ड' आणि 'स्पेशलाइज्ड ऑर्थोपेडिक रिहॅबिलिटेशन सेंटर अवॉर्ड' देऊन गौरविण्यात आले. 'आयएपी'चे अध्यक्ष डॉ. संजीव झा यांच्या हस्ते संचेती हेल्थकेअर अकॅडमीच्या अध्यक्षा मनीषा संघवी आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राधा भट्टड यांनी हे तिन्ही पुरस्कार स्वीकारले.

शैक्षणिक गुणवत्ता आणि आधुनिक संशोधनाची दखल

सुमारे सात दशकांची परंपरा असणाऱ्या 'आयएपी' या शिखर संस्थेतर्फे फिजिओथेरपी क्षेत्रातील शैक्षणिक गुणवत्ता, नावीन्यपूर्ण वैद्यकीय उपक्रम आणि संशोधनातील योगदानासाठी हे पुरस्कार दिले जातात. पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती यांच्या दूरदृष्टीतून १९९५ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेत पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. स्तरावर विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते. टर्शरी केअर रुग्णालयातील प्रत्यक्ष रुग्णसेवा, आधुनिक पुनर्वसन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि संशोधन या त्रिसूत्रीमुळे संस्थेने राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सामूहिक प्रयत्नांचे फळ: मनीषा संघवी

हा पुरस्कार म्हणजे गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेल्या आमच्या शैक्षणिक दृष्टिकोनाला मिळालेली पावती असल्याचे संचेती हेल्थकेअर अकॅडमीच्या अध्यक्षा मनीषा संघवी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, संस्थापक डॉ. के. एच. संचेती यांची दूरदृष्टी, प्राध्यापक, वैद्यकीय तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक योगदानाचा हा सन्मान आहे. हा गौरव फिजिओथेरपी शिक्षण आणि रुग्णसेवेत उत्कृष्टतेचे नवे मानदंड प्रस्थापित करण्यासाठी अधिक ऊर्जा देईल.