अंबाजोगाई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या २७ नोव्हेंबर २०२६ च्या आदेशानुसार, राज्यभरात १ डिसेंबर २०२६ पासून ‘महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलान अभय योजना-२०२६’ लागू होत आहे. थकीत ई-चलनांची प्रभावी वसुली व्हावी व नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी पात्र तडजोडपात्र चलनांच्या दंडावर २० टक्के सवलत दिली जाणार आहे.
ही योजना तीन टप्प्यांत राबवली जाईल. पहिल्या टप्प्यात २१ जानेवारी २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ दरम्यानच्या प्रलंबित चलनांवर योजना सुरू झाल्यापासून ३० दिवसांत दंड भरल्यास सूट मिळेल. दुसऱ्या टप्प्यात १ डिसेंबर २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२७ दरम्यानच्या नव्या चलनांवर ४५ दिवसांत भरणा केल्यास सवलत लागू राहील. तिसऱ्या टप्प्यात ३० जानेवारी २०१९ ते २० जानेवारी २०२६ दरम्यान न्यायालयात प्रलंबित असलेल्या पात्र चलनांवर ३० दिवसांत दंड भरल्यास २० टक्के सूट दिली जाईल.
केवळ वाहतूक पोलिसांच्या तडजोडपात्र चलनांनाच हा लाभ मिळणार असून, मुदतीनंतर पूर्ण दंड वसुलीसह परवाना निलंबन किंवा वाहन जप्तीची कारवाई होऊ शकते. त्यामुळे अंबाजोगाई शहर व परिसरातील वाहनधारकांनी ऑनलाइन किंवा पोलीस विभागात विहित मुदतीत दंड भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी केले आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!