केज : बालाघाटच्या डोंगररांगांलगत असलेल्या केज तालुक्यातील नागझरी शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली असून, घटनेची माहिती मिळताच धारूर वन उपविभागाच्या पथकाने परिसरात धाव घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

नागझरी येथील शेतकरी पांडुरंग महादेव चौरे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले असता, वडाजाई देवीच्या मंदिरासमोरील शेतात त्यांना बिबट्या आढळून आला. अचानक बिबट्याला समोर पाहून चौरे यांची भंबेरी उडाली; मात्र बिबट्याला त्यांची चाहूल न लागल्याने तो शेजारील झुडपांमध्ये निघून गेला. या घटनेनंतर पांडुरंग चौरे यांनी तातडीने गावात येऊन ग्रामस्थांना याची कल्पना दिली.

सरपंचांनी टिपला बिबट्याचा व्हिडिओ

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी संबंधित परिसराकडे धाव घेतली असता, झुडपांमध्ये वावरणारा बिबट्या पुन्हा एकदा त्यांच्या निदर्शनास आला. यावेळी नागझरीचे सरपंच चंद्रसेन चौरे यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून, या चित्रफितीत बिबट्या स्पष्टपणे दिसत आहे. सुदैवाने, या बिबट्याने अद्याप कोणत्याही पाळीव प्राण्यावर किंवा मनुष्यावर हल्ला केल्याची नोंद नाही. मात्र, रब्बी हंगामाची कामे सुरू असल्याने शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

वन विभागाचे आवाहन आणि स्पष्टीकरण

या घटनेबाबत धारूर वन उपविभागाचे वनरक्षक सी. आर. मुंडे यांनी सांगितले की, या बिबट्याचा जन्म याच डोंगराळ भागात झालेला असून, मागील चार ते पाच वर्षांपासून या वनक्षेत्रात त्याचा नियमित वावर आहे. भक्ष्याच्या शोधात हा बिबट्या सुमारे दहा किलोमीटरच्या परिघात फिरत असतो. तो सध्या वन विभागाच्याच हद्दीत असून, त्याने अद्याप कोणावरही हल्ला केलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी अजिबात घाबरून न जाता सतर्क राहावे आणि शेतात जाताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे.