अंबाजोगाई (दि. २८) : योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने २७ नोव्हेंबर २०२६ रोजी जगप्रसिद्ध लोणार सरोवर येथे एकदिवसीय शैक्षणिक व संशोधनात्मक अभ्यासभेटीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधक वृत्ती विकसित व्हावी, या उद्देशाने आयोजित या उपक्रमात एम.एस्सी. सूक्ष्मजीवशास्त्राच्या १७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य डॉ. एम. व्ही. कानेटकर आणि उपप्राचार्य डॉ. आर. व्ही. कुलकर्णी यांच्या सहकार्याने ही भेट यशस्वी झाली. वर्गखोलीतील शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाधारित ज्ञान मिळावे आणि स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित व्हावीत, यासाठी अशा क्षेत्रीय सहलींचे आयोजन गरजेचे असल्याचे मत चंद्रशेखर बर्दापुरकर यांनी व्यक्त केले.
सूक्ष्मजीव आणि जैवतंत्रज्ञान संशोधनाला चालना उल्कापिंडाच्या आघातामुळे बेसॉल्ट खडकात निर्माण झालेले लोणार सरोवर हे त्याच्या क्षारयुक्त व अल्कधर्मी पाण्यामुळे सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासासाठी नैसर्गिक प्रयोगशाळा मानले जाते. विद्यार्थ्यांनी सरोवराच्या विविध भागांतून पाण्याचे नमुने संकलित केले आणि पाण्याचा सामू, तापमान व क्षारता या घटकांचे निरीक्षण केले. येथील प्रतिकूल परिस्थितीत तग धरणाऱ्या अल्कलीप्रिय (Alkaliphiles), क्षारप्रिय (Halophiles) आणि आर्किया (Archaea) यांसारख्या सूक्ष्मजीवांचे विलगीकरण व शुद्ध संवर्धन करून त्यातून औद्योगिकदृष्ट्या उपयुक्त एन्झाइम्स शोधण्याचे पुढील नियोजन विभागाने केले आहे.
प्राध्यापकांचे मार्गदर्शन सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अनिल नरसिंगे यांच्या देखरेखीखाली पार पडलेल्या या अभ्यासभेटीत प्रा. आदित्य कदम व प्रा. तुषार करपूडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी लोणार येथील रझीक सर आणि समीर सर यांचे विशेष सहकार्य लाभल्याने विभागाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. या क्षेत्रीय अनुभवामुळे विद्यार्थ्यांच्या प्रयोगात्मक कौशल्यांना आणि संशोधनाच्या जिज्ञासेला मोठी चालना मिळाली आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!