केज (दि. २८) : केज पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध (डीबी) पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे धडाकेबाज कारवाई करत अहिल्यानगर जिल्ह्यातील एका अट्टल दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. संजय बबन पवार (रा. खर्डा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) असे या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या तब्बल १५ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
केज शहरातून चोरीला गेलेल्या एका मोटारसायकलचा तपास करत असताना डीबी पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले. या तपासात सदर गुन्हा खर्डा (ता. जामखेड) येथील संजय बबन पवार याने केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पथकाने जामखेड येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. सखोल चौकशीअंती त्याने बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांतून दुचाकींचे हँडल लॉक तोडून व बनावट चावीचा वापर करून या मोटारसायकली चोरून विक्री केल्याची कबुली दिली.
चकवा देणारा आरोपी अखेर जाळ्यात आरोपी संजय बबन पवार हा पायाने अधू (लंगडा) असूनही अतिशय शिताफीने दुचाकी चोरून पोलिसांना सातत्याने चकवा देत होता. त्याने आणखीही काही दुचाकी चोरल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठांकडून पथकाचे कौतुक सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम आणि पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलीस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, राहुल तरकसे, नितीन वारे, संतोष गित्ते, शिवाजी कागदे आणि दादाराव देवगुडे यांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली. "डीबी पथकाची ही कारवाई मोठी असून त्यांची कामाची निष्ठा आणि मेहनत वाखाणण्याजोगी आहे," अशा शब्दांत सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांनी पथकाचे अभिनंदन केले, तर पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनीही कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!