मुंबई : महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या (वरळी, मुंबई) वैद्यकीय संचालक पदावर कार्यरत असलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची प्रतिनियुक्ती राज्य शासनाने संपुष्टात आणली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने २७ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबतचा अधिकृत शासन आदेश जारी केला असून, डॉ. थोरात यांच्या सेवा आता मुंबई येथील आरोग्य सेवा आयुक्तांच्या मूळ आस्थापनेवर परत करण्यात आल्या आहेत.

यापूर्वी २१ ऑगस्ट २०२५ रोजीच्या आदेशान्वये डॉ. थोरात यांचे निलंबन त्यांच्याविरुद्धच्या विभागीय चौकशीच्या अधीन राहून रद्द करण्यात आले होते. त्यानंतर ९ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांची महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीमध्ये वैद्यकीय संचालक पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली होती.

मात्र, शासनाच्या ताज्या निर्णयानुसार त्यांची ही प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना पुन्हा मूळ विभागात वर्ग करण्यात आले आहे. अवर सचिव महेश लाड यांच्या स्वाक्षरीने आणि सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने हा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.