केज : बीड जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वाच्या आढावा बैठकीला, तसेच थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यात गैरहजर राहणे केजचे तहसीलदार भारत गंगावणे यांना चांगलेच भोवले आहे. या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी त्यांच्याकडील तहसीलदार पदाचा कार्यभार काढून घेतला असून, तो नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्याकडे सोपवला आहे.
बैठकीला आणि दौऱ्यांना अनुपस्थिती
केजचे तत्कालीन तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती निधनानंतर दीड महिन्यापूर्वी, म्हणजेच ऑगस्टमध्ये भारत गंगावणे यांनी या पदाची सूत्रे हाती घेतली होती. मात्र, नुकत्याच आमदार नमिता मुंदडा यांच्या उपस्थितीत दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात पार पडलेल्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीला गंगावणे गैरहजर होते. या बैठकीला विभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी उपस्थित असताना तहसीलदारांची अनुपस्थिती आमदार मुंदडा यांनी निदर्शनास आणून दिली. यासोबतच, १ सप्टेंबर आणि २६ सप्टेंबर रोजी खुद्द जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केजला दिलेल्या भेटीदरम्यानही गंगावणे गैरहजर असल्याचे समोर आले.
जिल्हाधिकाऱ्यांचा ठपका
राज्यात सध्या गंभीर दुष्काळसदृश्य परिस्थिती असून, तहसीलदार हा तालुकास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन आणि दुष्काळ निवारण उपाययोजनांचा प्रमुख समन्वयक असतो. अशा आणीबाणीच्या काळात अत्यंत महत्त्वाच्या पाहणी दौऱ्यांना आणि आढावा बैठकींना अनुपस्थित राहिल्यामुळे गंगावणे यांच्याकडून अपेक्षित कार्यक्षमता आणि उपलब्धता सुनिश्चित होत नसल्याचा ठपका जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला आहे. दुष्काळ निवारणाचे क्षेत्रीय स्तरावरील कामकाज प्रभावीपणे हाताळले जावे, यासाठी प्रशासनाने हा तातडीचा निर्णय घेत गंगावणे यांच्या जागी नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्याकडे केज तहसीलचा पदभार दिला आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!