केज: विवाहानंतर बहुतांश जोडपे पर्यटनस्थळी किंवा तीर्थक्षेत्री जाण्याला पसंती देतात. मात्र, या परंपरेला फाटा देत डॉ. विवेक आणि डॉ. सोनी या नवपरिणीत दांपत्याने आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात एका अत्यंत भावनिक आणि सामाजिक उपक्रमाने केली. विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी, ५ ऑक्टोबर रोजी त्यांनी बीड जिल्ह्यातील पाली येथील इन्फंट इंडियाच्या 'आनंदवन'मध्ये जाऊन तिथल्या एचआयव्ही बाधित अनाथ मुलांसोबत वेळ घालवला आणि फराळ वाटप करत त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. नवदांपत्याच्या या कृतीमुळे समाजासमोर एक अतिशय संवेदनशील आणि प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.
कॅप्टनच्या सुपुत्राचा प्रेरणादायी निर्णय
भारतीय सैन्यदलातील महार रेजिमेंटमध्ये सलग ३० वर्षे देशसेवा केलेले निवृत्त कॅप्टन रावसाहेब बचुटे यांचा डॉ. विवेक हा सुपुत्र आहे. कॅप्टन बचुटे यांनी दक्षिण आफ्रिका, अंदमान-निकोबार, लेह-लडाख, आसाम, गुवाहाटी, राजस्थान आणि भारत-पाक सीमेवर आपल्या शौर्याची मोहोर उमटवली आहे. पंचायत समितीचे निवृत्त विस्तार अधिकारी गणेश माने यांची कन्या डॉ. सोनी हिच्यासोबत डॉ. विवेक यांचा विवाह ४ ऑक्टोबर रोजी परभणी येथे मोठ्या थाटात पार पडला. मात्र, या सोहळ्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी या दांपत्याने स्वतःच्या आनंदापेक्षा समाजातील उपेक्षित मुलांच्या आनंदाला प्राधान्य देत थेट आनंदवन गाठले.
अनाथ बालकांच्या चेहऱ्यावर फुलले हसू
दत्ता बारगजे आणि संध्या बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली एचआयव्ही बाधित अनाथ मुलांसाठी इन्फंट इंडिया हे एक मोठे आधारवड चालवले जाते. या चिमुकल्यांच्या आयुष्यात मायेची ऊब निर्माण करण्यासाठी डॉ. विवेक आणि डॉ. सोनी यांनी मुलांसोबत फराळाचा आस्वाद घेतला. या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमुळे आजारपणाशी आणि एकाकीपणाशी झुंजणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला. या भावनिक प्रसंगी संध्या बारगजे यांच्यासह प्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. आकाश बचुटे, दीक्षा ऊर्फ रजनी बचुटे, बलभीम बचुटे, रितेश बचुटे, खुशी आणि राम शिंदे आवर्जून उपस्थित होते.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!