शिरूर कासार तालुक्यातील मातोरी शिवारात कानिफनाथ मंदिराजवळ एका ३६ वर्षीय अभियंत्याला रात्रीच्या वेळी बंदुक आणि चाकूचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी त्याला बेदम मारहाण करून मोबाईल, पेन ड्राईव्ह आणि ऑनलाईन पैशांसह एकूण २ लाख ४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबवला आहे.

७ ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास महेश मदनराव सोळंके हे त्यांच्या पल्सर दुचाकीवरून (नॅशनल हायवे ६१ वरून) गावी जात होते. यावेळी चार अनोळखी व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करून त्यांना मातोरी शिवारात अडवले. आरोपींनी महेशला बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे १४,५०० रुपये (दहा हजार आणि साडेचार हजार अशा दोन टप्प्यांत) वळवून घेतले. तसेच ९० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि तीन पेनड्राईव्ह असा एकूण २ लाख ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. चकलांबा पोलिसांनी याप्रकरणी चार अज्ञात आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास सुरू आहे.