शिरूर कासार येथील 'कालिका गणेश विकास केंद्र' या हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचे खिशे कापून अज्ञात चोरट्याने ६४ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना ७ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीन ते साडेसात वाजेच्या दरम्यान घडली.

फिर्यादी राहुल विठ्ठल गायकवाड (वय ३०) आणि त्यांचा सहकारी स्वप्निल भंडारे हे रात्रभर काम करून थकल्यामुळे पहाटे साडेतीनच्या सुमारास पेट्रोल पंपाच्या कार्यालयात उघड्या दरवाजाजवळ झोपले होते. सकाळी ते उठले असता, राहुल यांच्या उजव्या खिशातील पेट्रोल-डिझेल विक्रीचे ६२,५७० रुपये आणि डाव्या खिशातील स्वतःचे १५०० रुपये, अशी एकूण ६४,०७० रुपयांची रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले. कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या पॅन्टचे खिशे कापून ही रोकड पळवली आहे. याप्रकरणी राहुल गायकवाड यांच्या तक्रारीवरून शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.