शिरूर कासार (बीड): - तालुक्यातील खोकरमोह आणि घुगेवाडी फाटा परिसरात बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन विनानंबर टेम्पोंवर पोलिसांनी सोमवारी (दि. १४) धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी प्रत्येकी दोन ब्रास वाळूसह दोन्ही वाहने असा एकूण ४० लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन चालकांविरुद्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा

खोकरमोह येथील आघाव वस्तीजवळ विनानंबर टाटा टेम्पोतून बेकायदेशीर वाळू नेली जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी रात्री १० च्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत चालक सलमान बेग रईस बेग (वय २६, रा. खासबाग, बीड) याला ताब्यात घेऊन २० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तत्पूर्वी, दुपारी ४ वाजता घुगेवाडी फाटा येथे अशाच प्रकारच्या विनानंबर टेम्पोवर कारवाई करत चालक फरखान बागवान नदीम बागवान (वय २३, रा. खासबाग, बीड) याच्याकडून २० लाख १२ हजारांची वाळू व वाहन जप्त करण्यात आले.

दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अंमलदार दादासाहेब उबाळे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात शिरूर कासार ठाण्यात गुन्हे रजिस्टर क्रमांक २१६ आणि २१७ नुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक राजेश गडवे यांच्या मार्गदर्शनाखाली दादासाहेब उबाळे आणि पोलीस कर्मचारी तांदळे यांनी केली.