शिरूर कासार: बीड-शिरूर-पाथर्डी महामार्गावर हिवरसिंगा परिसरात मंगळवारी (दि. २९ सप्टेंबर) मध्यरात्री भरधाव टेम्पोने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत दोन सख्ख्या भावांसह त्यांच्या मामाचा जागीच मृत्यू झाला. रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास घडलेल्या या थरारक अपघातामुळे बीड आणि शिरूर परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत असून, अपघातानंतर टेम्पो चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला आहे.

मध्यरात्री घडला भीषण अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, बीडकडून शिरूरकडे जाणाऱ्या एमएच १२ एम व्ही ६०२३ या क्रमांकाच्या भरधाव टेम्पोने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर दूरवर फेकले गेले. या अपघातात राम शेळके (वय २५, रा. शिरूर) तसेच त्यांचे भाचे मंगेश रोहिदास बजगुडे (वय १६) आणि गणेश रोहिदास बजगुडे (वय २१, दोघे रा. गोरे वस्ती, बालेपीर, बीड) या तिघांचाही गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.

परिसरात हळहळ; पोलिसांकडून तपास सुरू

बीड-शिरूर-पाथर्डी मार्गावर अपघातांची मालिका सातत्याने सुरू असून, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमधून संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर फरार झालेल्या टेम्पो चालकाचा शोध सुरू असून, या दुर्दैवी घटनेचा पुढील तपास पाटोदा पोलीस करत आहेत.