बीड जिल्ह्यात लाचखोरीला मोठे उधाण आले असून, आता पवित्र मानला जाणारा शिक्षण विभागही यातून सुटलेला नाही. तक्रारदाराचा चौकशी अहवाल आपल्या बाजूने तयार करून तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवू नये, यासाठी तब्बल २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना केज येथील शिक्षण विभागातील दोन कर्मचाऱ्यांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने बुधवारी दुपारी रंगेहाथ पकडले.

दत्तात्रय मुरलीधर चाटे (वय ५६, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती केज) आणि जयगुरु शिवाजी गिरी (जिल्हा परिषद शिक्षक, तांदळे वस्ती) अशी कारवाई करण्यात आलेल्या या दोन लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदाराची शिक्षण विभागात चौकशी सुरू होती, मात्र कारवाई टाळण्यासाठी या दोघांनी पैशांची मागणी केली. तक्रारदाराने थेट जालना एसीबीकडे धाव घेतल्यानंतर, पथकाने वेगाने दखल घेत केज येथील गट साधन केंद्रात सापळा रचून या दोघांच्या मुसक्या आवळल्या.

कुठलेही काम पैशांशिवाय होत नसल्याने सर्वसामान्य नागरिक आधीच त्रस्त आहेत. मात्र, जालना एसीबीने केलेल्या या धडक कारवाईमुळे लाचखोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी सध्या केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, एसीबीच्या पथकाचे सर्व स्तरातून मोठे कौतुक होत आहे.