बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आरोपी विष्णू चाटे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने सीडीआर, सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक व्हॉइस सॅम्पलसह भक्कम पुरावे न्यायालयात सादर केले आहेत. तसेच, मकोका आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तब्बल १८०० पानांचे सविस्तर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. न्यायालयाच्या या कठोर निर्णयामुळे आरोपी विष्णू चाटे याला आता नव्याने जामिनासाठी किमान एक वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे.

९ डिसेंबर २०२४ रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांना टाकळी शिवारातील सुदर्शन घुले याच्या शेतात नेण्यात आले. तेथे लोखंडी रॉड आणि गॅस पाईपने अमानुष मारहाण करत त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या खळबळजनक हत्याकांडात विष्णू चाटे, जयराम चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, महेश केदार आणि प्रतीक घुले या आरोपींचा थेट सहभाग निष्पन्न झाला आहे. तपासादरम्यान पोलिसांना आरोपींच्या मोबाईलमधून हत्येशी संबंधित १५ व्हिडिओ आणि ८ फोटो सापडले आहेत. यात संतोष देशमुख यांना होणारी मारहाण आणि त्यानंतर आरोपींनी साजरा केलेला आनंद स्पष्टपणे दिसून येत असल्याने राज्यभरात तीव्र संताप व्यक्त झाला होता.

या हत्याकांडाच्या वेळी आरोपींनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या परळीतील वाल्मीक कराड याला थेट व्हिडिओ कॉल करून हत्येचा थरार दाखवल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या धक्कादायक माहितीमुळे प्रकरणाला अत्यंत गंभीर वळण मिळाले असून पोलिसांनी या सर्वांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) कारवाई केली आहे. या भक्कम परिस्थितीजन्य आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे खंडपीठाने आरोपीला कोणताही कायदेशीर दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.