अंबाजोगाई: पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे राज्यभरात ९९ नांदी संमेलने आयोजित केली जात आहेत. या श्रृंखलेचा एक भाग म्हणून अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचा नाट्यशास्त्र विभाग, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी 'नांदी नाट्य संमेलना'चे आयोजन करण्यात आले आहे. हे एकदिवसीय संमेलन योगेश्वरी शिक्षण संस्था परिसरातील नागापूरकर सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडणार आहे.

या नाट्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार तथा अभिनेते योगेश सोमण यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बीडच्या ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. दीपाताई क्षीरसागर भूषविणार असून, प्रमुख अतिथी म्हणून के. एस. के. महाविद्यालय बीडचे उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर उपस्थित राहणार आहेत. योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असतील.

नाट्य रसिकांसाठी या संमेलनात विविध दर्जेदार कलाकृतींची मेजवानी असणार आहे. यामध्ये लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाची 'बरड' ही एकांकिका, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाची 'सामना' ही एकांकिका आणि रंगभूमीवरील 'फारच टोचलयं' या व्यावसायिक नाटकाचा समावेश आहे. याशिवाय स्थानिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नाट्यगीते आणि मुकनाट्य रसिकांना पाहता येईल. या संमेलनासाठी केवळ शंभर रुपये प्रवेश मूल्य ठेवण्यात आले असून, यात रसिकांसाठी भोजन, चहा आणि सहभाग प्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संमेलनाच्या समारोप सत्रात योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे आणि ॲड. जगदीश चौसाळकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या साहित्यिक व नाट्यमय सोहळ्याला सर्व नाट्य रसिक, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. संपदा कुलकर्णी आणि डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले आहे.