बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी टोलनाका परिसरात 'टाटा मोटर्स' या नामांकित कंपनीच्या नावाने बनावट डीईएफ (DEF) वॉटरची विक्री करणाऱ्या पाच हॉटेल चालकांवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २ लाख ७० हजार ८७७ रुपये किमतीचा बनावट मुद्देमाल जप्त केला आहे.

वाहनांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी वापरण्यात येणारे डीईएफ वॉटर टाटा कंपनीच्या लोगोचा अनधिकृत वापर करून बनावट बकेटमध्ये विकले जात असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तपास अधिकारी गौरव श्रीवास्तव यांनी पोलिसांच्या मदतीने पाडळसिंगी परिसरातील वृंदावन, गायत्री नाष्टा सेंटर, हॉटेल साहेब, साई अमृत आणि रॉयल शेतकरी या हॉटेल्ससमोर धाड टाकली. यावेळी हॉटेल चालक शरद साबळे, सुदाम धर्मे, रवींद्र मोरे, तालेब शेख आणि आदिनाथ मराठे यांच्याकडून टाटा मोटर्सचे बनावट स्टिकर लावलेले २० आणि १० लिटर क्षमतेचे बकेट जप्त करण्यात आले.

स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांची व कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी या पाचही जणांविरुद्ध कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामदास खोत करत आहेत.