बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या एका बोगस डॉक्टरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) गुरुवारी (२९ ऑक्टोबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाच्या मदतीने ही मोठी कारवाई केली.

पोलीस अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झालेल्या गुप्त तक्रारीवरून, सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांच्या पथकाने राजीव गांधी चौकाजवळील शिवनेरी कॉलनीतील 'संजीवनी आयुर्वेदिक हॉस्पिटल'वर अचानक छापा टाकला. त्यावेळी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणारा ऋषिकेश दत्तात्रय कानडे हा डॉक्टर बोगस असल्याचे समोर आले. वैद्यकीय पथकाने रुग्णालयाच्या भिंतीवर लावलेली प्रमाणपत्रे तपासली असता, ती संपूर्णपणे बनावट असल्याचे उघडकीस आले.

या कारवाईदरम्यान एफडीएच्या पथकाने रुग्णालयातून अनेक औषधे आणि इंजेक्शन्स जप्त केली आहेत. याप्रकरणी शासकीय वैद्यकीय अधिकारी प्रीतम रामेश्वर लोध यांच्या फिर्यादीवरून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात ऋषिकेश कानडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि वैद्यकीय व्यवसाय अधिनियमानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. गोरगरीब रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या या बोगस डॉक्टरच्या अटकेमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.