अंबाजोगाई: येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या (स्वाराती) रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांच्या डोळ्यांना 'सेरेशिया मार्सेसेन्स' या दुर्मिळ जिवाणूचा संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या या शस्त्रक्रियांनंतर रुग्णांना त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर तातडीने जालना येथे उपचार करण्यात आले. सद्यस्थितीत त्यांची दृष्टी कमी झाली असून, रुग्णालय प्रशासनाकडून ती पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.   

शस्त्रक्रियेनंतर नेमके काय घडले?

स्वाराती रुग्णालयात १७ ऑक्टोबर रोजी मोतीबिंदूच्या २२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. मात्र, शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी यातील चार रुग्णांना डोळ्यांचा त्रास जाणवू लागला. रुग्णालय प्रशासनाने तातडीने आवश्यक औषधोपचार सुरू केले, मात्र संध्याकाळपर्यंत हा त्रास वाढल्याचे निदर्शनास आल्याने लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ नेत्रचिकित्सकांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या सल्ल्यानुसार आणि पुढील अद्ययावत उपचारांसाठी १९ तारखेला पहाटे या चारही रुग्णांना जालना येथील गणपती नेत्रालयात हलवण्यात आले. तिथे २५ तारखेपर्यंत त्यांच्यावर उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली. या बाधित रुग्णांमध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. त्या दिवशी शस्त्रक्रिया झालेल्या उर्वरित रुग्ण मात्र ठणठणीत आहेत.

दुर्दैवी घटना, दुर्मिळ विषाणूची नोंद:  डॉ. ज्ञानोबा दराडे (विभागप्रमुख)

या दुर्दैवी घटनेबाबत अधिक माहिती देताना नेत्ररोग विभागप्रमुख डॉ. ज्ञानोबा दराडे यांनी सांगितले की, रुग्णांच्या डोळ्यांतील सॅम्पलच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय तपासणीत 'सेरेशिया मार्सेसेन्स' (Serratia marcescens) नावाचा अत्यंत दुर्मिळ जिवाणू आढळून आला आहे. विशेष आणि दिलासादायक बाब म्हणजे, ज्या दिवशी शस्त्रक्रिया झाली त्या दिवशी ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित असलेले सर्व डॉक्टर, परिचारिका आणि विद्यार्थ्यांचे नेझल स्वॅब (nasal swabs) घेऊन तपासणी केली असता, हा जिवाणू त्यांच्यामध्ये किंवा शस्त्रक्रियागृहात कुठेही आढळलेला नाही. त्यामुळे हा संसर्ग नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा सखोल आणि शास्त्रीय तपास प्रशासनाकडून सुरू आहे. बाधित रुग्णांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. 'स्वाराती' रुग्णालयात दर महिन्याला ३५० ते ४०० च्या आसपास नेत्र शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीपणे होतात, मात्र असा प्रकार पहिल्यांदाच घडला असल्याचे डॉ. दराडे यांनी स्पष्ट केले. सध्या या रुग्णांची दृष्टी कमी झालेली असली तरी, वरिष्ठ तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सुरू असलेल्या औषधोपचारांद्वारे त्यांची दृष्टी पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.