बीड: बीड जिल्ह्यातील नागरिकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि वेगवान व्हावा, रेल्वे मार्गामुळे गावांचा रस्ते संपर्क बाधित होऊ नये, यासाठी खा.बजरंग सोनवणे यांनी अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील विविध ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि पर्यायी रस्ते उभारण्याचा प्रश्न रेल्वे प्रशासनाकडे मांडला आहे. खा.सोनवणे यांनी एप्रिल २०२५ मध्ये केलेल्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाने सविस्तर उत्तर देत संबंधित कामांची सद्यस्थिती स्पष्ट केली आहे.
खा.सोनवणे यांनी बीड शहरातील ढोलेवस्ती येथे रेल्वे भुयारी मार्ग उभारण्यासह जिल्ह्यातील दहा ठिकाणी उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग उभारण्याची मागणी केली होती. यामध्ये चऱ्हाटा, राजुरी नवगण, हिवरसिंगा, विघनवाडी, गोमळवाडा, कारेगाव, गांधनवाडी, कडा, सोलापूरवाडी आणि घुगेवाडी/बारगवाडी या ठिकाणांचा समावेश आहे. नागरिकांची गैरसोय, वाहतुकीचा खोळंबा आणि सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन या मागण्या करण्यात आल्या होत्या. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, चऱ्हाटा ते बीड दरम्यान साखळी क्रमांक १६६६३५ येथील उड्डाणपुलाला ६ नोव्हेंबर २०१५ रोजी मंजुरी मिळाली आहे. या ठिकाणी रेल्वे फाटक उपलब्ध असून, ते हटविण्याच्या अनुषंगाने उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. हा बीड जिल्ह्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. बीड शहरातील ढोलेवस्ती येथे साखळी क्रमांक १७३००० वर रेल्वे भुयारी मार्गाची मागणी करण्यात आली आहे. या ठिकाणी सध्या काम मंजूर नसले, तरी या अतिरिक्त मागणीसाठी तांत्रिक व्यवहार्यता अहवाल आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे या मागणीच्या तांत्रिक व्यवहार्यतेचा अभ्यास करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राजुरी नवगण-बीड ते रायमोहा मार्ग, हिवरसिंगा गावाकडे जाणारा रस्ता, विघनवाडी येथील राक्षसभुवनकडे जाणारा मार्ग, गोमळवाडा येथील नांदूरझ्रराक्षसभुवन रस्ता आणि कारेगाव येथील डोंगरकन्हीझ्रजेधेवाडी मार्ग या ठिकाणच्या मागण्यांबाबतही तांत्रिक व्यवहार्यता व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
गांधनवाडीसाठी पर्यायी समांतर रस्त्याचा प्रस्ताव
गांधनवाडी येथे गावकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी सुलभ मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने पर्यायी उपाय सुचविला आहे. संबंधित ठिकाणापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर आधीच उड्डाणपूल उपलब्ध असल्याने, अहिल्यानगरच्या बाजूने रेल्वेच्या उपलब्ध जागेत सुमारे अर्धा किलोमीटर लांबीचा समांतर रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामुळे नवीन उड्डाणपूल उभारण्याची गरज टाळता येऊ शकते. या पर्यायाच्या अनुषंगानेही अहवालाची प्रक्रिया सुरू असल्याचे पत्रात नमूद आहे.
कडा, सोलापूरवाडी, घुगेवाडीबाबत स्पष्टीकरण
कडा-धामणगाव मार्गावरील वाहतूक सुमारे ८०० मीटर अंतरावरील उड्डाणपुलावरून होत असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या ठिकाणी राज्य शासनाने उड्डाणपूल मंजूर केला असून, त्याचे बांधकाम राज्य शासनाकडून करण्यात येणार असल्याने रेल्वेच्या स्वतंत्र उड्डाणपुलाची आवश्यकता नसल्याचे पत्रात म्हटले आहे. सोलापूरवाडी येथे सुमारे ४०० मीटर अंतरावर उड्डाणपूल आणि पर्यायी रस्ता उपलब्ध असल्याने स्वतंत्र उड्डाणपुलाची गरज नसल्याचे प्रशासनाने कळविले आहे. घुगेवाडी/बारगवाडी येथेही सुमारे ६०० मीटर अंतरावरील भुयारी मार्गावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. या ठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असल्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून उड्डाणपुलाचा विचार केला जाऊ शकतो, असे रेल्वे प्रशासनाने नमूद केले आहे.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!