बीड - महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने राज्यभरात ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्राचा समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करणे, छत्रपती शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी विचार आणि स्वराज्याची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे तसेच गड-किल्ल्यांच्या सामरिक व ऐतिहासिक महत्त्वाविषयी जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. . बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले  आहे.

            या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात या उपक्रमाची व्यापक व प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक पावले उचलली आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी आणि शिक्षण विभागाला पत्राद्वारे आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, शासकीय व अनुदानित शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच संबंधित विभागांनी या उपक्रमात उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग नोंदवावा, यासाठी व्यापक प्रचार-प्रसिद्धी करण्याचे आवाहन माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

दुर्ग निर्मितीच्या परंपरेतून शिवविचारांचा जागर :-

            दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मातीचे गड-किल्ले तयार करण्याची परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. बदलत्या जीवनशैलीत मुलांचा मोबाईल आणि डिजिटल माध्यमांकडे वाढणारा कल लक्षात घेता, त्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्यास आणि मातीशी नाते जोडण्यास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

            या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतः किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करताना तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वारे आणि संरक्षण व्यवस्था यांचा अभ्यास करावा, असे अपेक्षित आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या महान इतिहासाविषयी अभिमानाची भावना विकसित होण्यास मदत होईल.

            दुष्काळी परिस्थितीत शिवकालीनजलव्यवस्थापनाची ओळख :-

            बीड जिल्ह्यासह राज्यात जाणवणाऱ्यापाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा अभ्यास अधिक महत्त्वाचा ठरतो. स्वराज्याच्या उभारणीत रयतेचे हित, शेतीचे संरक्षण आणि उपलब्ध साधनसंपत्तीचे योग्य नियोजन यांना प्राधान्य होते.

            विद्यार्थ्यांनी किल्ले तयार करताना किल्ल्यांवरील पाण्याच्या टाक्या, तलाव, पावसाचे पाणी साठविण्याच्या पारंपरिक पद्धती, धान्यसाठा आणि जलव्यवस्थापन या विषयांवर माहिती संकलित करावी. यातून केवळ ऐतिहासिक अभ्यास न होता, विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धन, पाणीबचत आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती निर्माण होणार आहे.

            युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील दुर्गांची ओळख :-

            मराठा लष्करी स्थापत्यपरंपरेची दखल घेत युनेस्कोने महाराष्ट्रातील १२ प्रमुख दुर्गांचा जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे. यामध्ये शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, लोहगड, साल्हेर, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि जिंजी यांचा समावेश आहे. या जागतिक दर्जाच्या वारशाची माहिती नव्या पिढीला व्हावी आणि दुर्गसंवर्धनाची जाणीव रुजावी, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा दृष्टिकोन आहे.

            विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा-महाविद्यालये व नागरिकांनी आपल्या परिसरातील सुरक्षित जागी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून दुर्गाची प्रतिकृती तयार करायची आहे. सार्वजनिक रहदारीला अडथळा येणार नाही आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन होईल, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. या उपक्रमांतर्गत नागरिक व विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या दुर्ग प्रतिकृती सोबतचे छायाचित्र (सेल्फी) ५ नोव्हेंबर २०२६ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत https://www.amrutdurgotsav.com/या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी अर्जासह अपलोड करायचे आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार सहभागींना डिजिटल अभिनंदन पत्र उपलब्ध करून दिले जाईल