परळी वैजनाथ l: शहरातील हिंद नगर आणि भवानी नगर परिसरात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. या त्रासाला कंटाळून संतप्त नागरिकांनी थेट मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन दिले आहे. परिसरात सुरू असलेली अवैध दारू विक्री तत्काळ बंद करावी आणि नवीन दुकानांना परवानगी देऊ नये, अशी परखड मागणी नागरिकांनी केली आहे.
परिसरातील दारू अड्ड्यांमुळे मद्यपींचा सुळसुळाट झाला असून सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा, शिवीगाळ आणि हाणामारीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. रस्त्यावर पडलेले मद्यपी आणि महिला, लहान मुलांसमोर उभे राहणारे असुरक्षिततेचे संकट यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे स्वातंत्र्य हिरावले गेले आहे. केवळ कागदोपत्री कारवाईचा फार्स न करता प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून या गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप लावावा, अशी संतापजनक भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. ड्राय डेच्या दिवशीही राजरोस दारू विकली जात असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भाजपा शहर उपाध्यक्ष प्रशांत कराड आणि स्थानिक रहिवाशांच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले. शासनाच्या नशामुक्ती अभियानाचा बोजवारा उडवणारी ही अवैध दारू विक्री त्वरित न थांबवल्यास रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्याचा थेट इशारा नागरिकांनी दिला आहे.












प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!